Saturday, October 21, 2006

प्रिय शिरीष कणेकर,


तुम्हाला पत्र लिहायला घेतलं , आणि जसं आपण पत्राच्या सुरवातीला 'पत्र लिहीण्यास कारण की..' अशी सुरवात करतो, ते कारण शोधायला लागलो. (मुर्खच आम्ही!!)कोणी भक्त आपल्या देवाची आरती करतो, ते काय कारण देऊन?

मी पुण्याचा आहे म्हणुन म्हणा, किंवा मला हसायला आणि हसवायला खुप आवडतं म्हणुन म्हणा, तुमच्या लेखांनी मला पहिल्यापासुनच भुरळ पाडली. हो, दुसरा शब्दच सुचत नाही. त्यामुळे मी तुमचा 'भुरळा' झालो आहे. इंग्रजी 'fan' ला दुर्दैवाने मराठीत चांगला प्रतिशब्द नाही. 'चाहता' हे फार परकं वाटतं. गर्दीत ऊभं राहील्यासारखं. एवढे परके नाही आहात तुम्ही माझ्यासाठी. तुमच्या लिखाणातुन, बोलण्यातुन, तुम्हाला भिनवून घेतलं आहे मी स्वतःमधे. नशा चढली आहे तुमची.तुमच्या लिखाणाची.

फटकेबाजी, फिल्लमबाजी, कणेकरी, हजारदा ऎकून पाठ करताना सतत तुमची मिश्किल मुद्रा डोळ्यासमोर यायची. तुम्ही हे वाक्य म्हणताना चेह-यावर कसे भाव आणत असाल हाच सतत विचार, व त्याप्रमाणे आरशासमोर उभं राहुन practice!! आजवर कधीही एकटेपणामुळं कंटाळा आल्याचं आठवत नाही. तुमचे विनोदांची उजळणी सुरु केली, की तास काय, दिवस कसे जातील हेसुद्धा कळणार नाही. तुमची जी जी सदरं चालू असायची ती अधाशासारखी वाचून काढायचो. तुमच्या सदरांची पुस्तकं मिळवून त्यांचीही पारायणं झाली.


तुम्ही आजवर इतरांवर खुप टीका केली आहे, करत रहाल. पण मला तरी असं वाटतं की सर्वात जास्ती टीका, किंवा खिल्ली, तुम्ही स्वतःची उडवली आहे. स्वतःच्या मित्रांचं, bossचं, कौतुक करताना तुम्ही कधीच थकत नाही. 'गोतावळा' वाचलं आणि तुमची ही सगळी मित्रमंडळीही मनापासुन आवडायला लागली. मात्रं स्वतःबद्दल बोलायची पाळी आली, की तुमच्या लेखणीला जबरदस्त धार चढते. स्वतःच स्वतःची टर उडवून जे हसू फुटतं, ते सर्वात सुंदर हसू ,असं म्हणतात. हे मी तुमच्या कितीतरी लेखातुन अनुभवलंय. तुमचे अण्णा गेले, त्या दिवसाबद्दल वाचताना, शब्दागणिक सुन्न होत गेल्याचं आठवतं, सुधीर जोशी गेले त्याबद्दल तुमचा लेख वाचताना डोळ्यात पाणी आल्याचंही आठवतं. तुमच्या 'dollarच्या देशा'च्या कित्येक वा-या केल्या,'एकला बोलो रे' बद्दल कित्येकांशी बोललो, तरीही अजुन वाचण्यासाठी हाव कायम आहेच. मी म्हटलं ना, नशा चढली आहे तुमची. पु.लं.नंतर मी कुठल्याही लेखकाचे पुस्तक वाचण्यासाठी एवढा अधीर झाल्याचे आठवत नाही.


नुकतीच तुम्ही साठी पार केलीत. पण तुमचा विनोद अजुनही ऎन जवानीत आहे.जवळ जवळ माझ्याच वयाचा व स्वभावाचा आहे.खोडकर आहे,खट्याळ आहे, लोकांच्या (व स्वतःच्याही!!) टोप्या उडवणारा आहे, पण सर्वात महतवाचं म्हणजे, निर्मळ आणि निर्भेळ आनंद देणारा आहे. अशीच तुमची लेखणी आमच्या आयुष्यात आनंद ओतीत रहावी, एवढी एकच मागणी आहे. ती पुरी कराल अशी आशाच नव्हे, तर खात्रीही आहे....

आपला (भुरळा) लेखनाभिलाषी,

प्रसाद चाफेकर.